जुने सिडकोत साकारणार अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती
राजे छत्रपती मित्र मंडळाचा २६वा गणेशोत्सव; नाशिक त्र्यंबकेश्वरला झालेल्या कुंभमेळ्याच्या आठवणींचे प्रदर्शन, व्यसनमुक्ती जनजागृती, रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नवीन नाशिक : जुने सिडको परिसरातील राजे छत्रपती मित्र मंडळ यंदा आपल्या २६व्या वर्षात पदार्पण करत असून, यंदाचा गणेशोत्सव ‘उत्सव… परंपरेचा, संस्कृतीचा… कुंभमेळा अन् गणेशोत्सवाचा!’ या संकल्पनेतून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार असून, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारे विशेष प्रदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वास्तुरचनेपासून प्रेरणा घेत साकारण्यात येणाऱ्या प्रतिकृतीची लांबी ६० फूट, रुंदी ४० फूट आणि उंची ५० फूट असून, ती दोन मजली रचना असणार आहे. या प्रतिकृतीमध्ये २७ स्तंभ आणि तीन भव्य प्रवेशद्वार असतील. उच्च दर्जाच्या फायबरचा वापर करून मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत असून, बदामी रंगसंगतीसह पारंपरिक भारतीय स्थापत्यकलेतील नक्षीकाम व कलात्मक कोरीव काम करण्यात येणार आहे. कुरनूल, आंध्र प्रदेश येथील कलाकार या प्रतिकृतीच्या निर्मितीचे काम करीत आहेत.
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात कुंभमेळ्यातील जुनी छायाचित्रे, महत्त्वाचे प्रसंग, विविध आठवणी आणि कुंभमेळ्याशी संबंधित माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. नाशिकच्या कुंभपरंपरेचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीला चालना देण्यासाठी व्यसनमुक्तीविषयक जनजागृती करण्यात येणार असून, व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत नागरिक आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, विविध आरोग्य तपासण्या नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राजे छत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक, शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांची असून, गणेशोत्सव २०२६ चे अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. मंडळाच्या २६व्या वर्षानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम साधणारा हा गणेशोत्सव यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.

ganpatinews