मुंबईकरांसाठी ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन

मुंबईकरांसाठी ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच मुंबईकरांसाठी ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा महोत्सव होणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत कलाकारांच्या गायन व वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता येणार असून, विविध प्रकारच्या शास्त्रीय संगीत सादरीकरणातून अभिजात संगीत परंपरेचे वैविध्य उलगडणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश निःशुल्क असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.